उमरेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर धाड; १० आरोपींवर गुन्हा दाखल, एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त!
उमरेड:
गुन्हेगारांवर वचक आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या उमरेड पोलिसांनी रविवारी एक अत्यंत यशस्वी आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलिसांनी हेवती शिवार रोडवरील ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी वाहने, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ७ लाख ५३ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शौर्यपूर्ण कारवाई
दिनांक १९ जुलै रोजी उमरेड पोलिसांना हेवती शिवार रोडजवळ काही इसम मोठ्या प्रमाणावर ५२ पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच, वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि गतीमान हालचाली करत घटनास्थळी अचानक धाड टाकली.
पोलिसांना पाहताच जुगार अड्ड्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने जागीच जुगार खेळणाऱ्या ४ प्रमुख आरोपींना रंगेहात अटक केली. यामध्ये विनोद शेषराव श्रीखंडे (३७, रा. मकरधोकडा उमरेड), अमोल विनोद शिवनकर (३६, रा. भाग्यश्री नगर खरबी नागपूर), मेघराज बापुरावजी गवखरे (३९, रा. दिघोरी नागपूर), आणि अतुल आनंदराव दुरबुळे (३८, रा. धुरखेडा उमरेड) यांचा समावेश आहे. धाड पडताच पळून गेलेल्या इतर ६ वाहन चालकांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.
उमरेड पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करून जुगारींचे कंबरडे मोडले आहे:
रोख रक्कम: ७८,७७० रुपये
मोबाईल: ४ नग (किंमत ४५,००० रुपये)
चारचाकी वाहन: हुंदाई कंपनीची व्हेर्ना कार (किंमत २,००,००० रुपये)
दुचाकी वाहने: बुलेट, बजाज पल्सर, स्प्लेंडर प्लस, होंडा हॉर्नेट, बजाज डिस्कव्हर आणि डीओ मोपेड (एकूण ६ दुचाकी)
पोलिसांनी एकूण ७,५३,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध कलम १२ म.जू.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाही उमरेड चे पोलीस निरीक्षक श्री. दानाजी जलक साहेब यांचे मार्गदर्शनात त्यांचे चमूने यशस्वी रित्या पार पाडली.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
