*वाळू माफियांच्या विरोधात कारवाया करणारे तहसीलदार स्वतःच निघाले लाचखोर; बीड ACB ची धडक कारवाई.*
*कुंपणानेच शेत खाल्ले!’ अंबडचे ‘प्रामाणिक’ तहसीलदार विजय चव्हाण ६ लाख ४० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!*
प्रामाणिक’ चेहऱ्यामागचा खरा चेहरा उघड! जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि महसूल विभागाला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. अंबडचे कथित कार्यतत्पर तहसीलदार विजय चव्हाण यांना तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना बीड एसीबीने (ACB) रंगेहात अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ही धडक कारवाई करण्यात आली.नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी (६ हायवा आणि पोकलेन मशीनसाठी) तहसीलदार चव्हाण यांनी ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची (मंथली) मागणी केली होती तडजोडीअंती ६ लाख ४० हजार रुपये ठरले.तक्रारदाराच्या तक्रारीवरून बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले.तहसीलदार विजय चव्हाण यांनी यापूर्वी अंबड तालुक्यात स्वतः वाळू माफियांविरोधात अनेक धडक कारवाया केल्या होत्या. तसेच निराधार व्यक्तींना मदत करून ‘एक प्रामाणिक अधिकारी’ अशी प्रतिमा निर्माण केली होती. मात्र, त्याच ” कुंपणानेच शेत खाणे” निघाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.
या कारवाईमुळे संपूर्ण महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत!
