भोसा-तिवरंग वाळूघाट प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल?
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
महागाव तालुक्यातील भोसा-तिवरंग वाळू साठवणूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन होत आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परवानगी एका ठिकाणासाठी असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी वाळू साठवण्यात आल्याचा आरोप होत असून, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आर्णी तालुक्यातील मौजा मुकिंदापूर येथील वाळूघाटातून उत्खनन केलेल्या वाळूची साठवणूक व विक्री करण्यासाठी पृथ्वी बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत परवानगी दिली आहे. ही परवानगी शासनाच्या नवीन वाळू धोरण-२०२५, करारनाम्यातील अटी, पर्यावरणीय नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे.
आदेशानुसार वाळू साठवणुकीसाठी गट क्रमांक ६२ मधील ०.११ हेक्टर खासगी जागा निश्चित करण्यात आली असून, ही जागा संबंधित वाळूघाटापासून सुमारे ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असल्याचे नमूद आहे. मात्र, प्रत्यक्षात वाळूचा साठा गट क्रमांक ६३ तसेच शासनाच्या जमिनीवर आणि रस्त्यालगत करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याशिवाय साठवणूक स्थळी आवश्यक माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
