बिटरगाव पोलीस हद्दीत गावठी हातभट्टीवर धडक कारवाई; ५९ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई करत गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण चार ठिकाणी छापे टाकून सुमारे ५९,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे मेट व ढाणखी शेत शिवार तसेच बिटरगाव परिसरात एकूण चार ठिकाणी पंचांच्या उपस्थितीत छापा कारवाई करण्यात आली.या कारवाईत १२०० लिटर मोहामास सडवा (किंमत ४८,००० रुपये) तसेच ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू (किंमत ३,००० रुपये) असा एकूण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच देशी व विदेशी दारूचा ८,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये हातभट्टी दारूचे नमुने तपासणीसाठी जप्त करून उर्वरित सडवा पंचनामा करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.या प्रकरणात
गजानन शामराव जाधव (वय ४२, रा. मेट ता. उमरखेड) रमेश थावरा चव्हाण (वय ३४, रा. मेट ता. उमरखेड)देविदास चंदू कवडे (रा. बिटरगाव ता. उमरखेड)संतोष नारायण देवकते (वय ३५, रा. बिटरगाव ता. उमरखेड)या चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व (फ) अंतर्गत बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उपाधीक्षक गायकवाड (उमरखेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली पुसद–उमरखेड पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा धाक निर्माण झाला असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.या कारवाईमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सतर्क असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बिटरगाव पोलीस हद्दीत गावठी हातभट्टीवर धडक कारवाई; ५९ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त
