गुढीपाडव्या पासुन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ,

गुढीपाडव्या पासुन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यंदाचे उत्सवाचे १०५ वे वर्षे

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी

सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार लेखक, ग्रंथकार भगवत् भक्त संतकवीतिलक वै.भीमराव मामा पारळकर यांनी प्रारंभ केलेला कै.गोविंदराव पारळकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अव्याहतपणे सुरू ठेवलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही गुढीपाडव्या पासुन प्रारंभ होत असुन यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन उत्सवाचे यंदाचे १०५ वे वर्षं आहे.पारंपारिक पद्धतीने आजही तशाच पद्धतीने साजरा होणारा पंचक्रोशीतील सर्वात जुना सप्ताह म्हणुन सुद्धा या उत्सवाची ओळख आहे.

चै.शु.प्रतिपदा दि.१९ मार्च रोजी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते परंपरेनुसार श्रीरामास अभिषेक पुजा करण्यात येईल.चै.शु.प्रतिपदा गुरुवार दि.१९ मार्च ते चै.शु.अष्टमी दि.२५ मार्च बुधवार पर्यंत दररोज रात्री ८-३० वाजता श्रीराम मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,किर्तनभुषण ह.भ.प.शेखरबुवा व्यास ( तळेगाव दाभाडे) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असुन त्यांना हार्मोनियम वर रविंद्र शिधये( पुणे) तर तबल्यावर कानिफ घैसास ( पुणे) हे साथसंगत करणार आहे.

चै.शु.नवमी दि.२६ मार्च रोजी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे परंपरेनुसार श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार असुन त्यांचे सलग ५४ वर्ष यंदाच्या कीर्तनाचे आहे.यावेळी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांची साथसंगत लाभणार आहे.दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.रात्री ८ वाजता श्री ची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे.यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ यांची साथसंगत लाभणार आहे.

तरी सर्व भाविकांनी या शतकोत्तर परंपरा असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे व उदारतेने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *