भागपूर उपसा सिंचन योजनेत सोयगाव तालुक्यातील गावांचा समावेश करा- इद्रिस मुलतानी
तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
सोयगाव, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यासाठी सुरू असलेल्या भागपूर उपसा सिंचन योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम जामनेर तालुक्यातील जलसंपदा विभागामार्फत सुरू असून, या योजनेच्या माध्यमातून सोयगाव तालुक्यातील काही गावांमधून पाइपलाइन जात आहे. मात्र, या गावांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची बाब इद्रिस मुलतानी यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
सदरील योजना ही तापी नदीच्या शेळगाव बॅरेज मधून ते पाणी पावसाळ्यात भागपूर धरणात साठवणार,
7 PMC पाणी पावसाळ्याच्या नंतरच्या कालावधीत सदरची पाणी भातपूर धरणातून उचलून जामनेर तालुक्यातील कोरडे झालेल्या लघु प्रकल्प व पाजर तलावावर सोडणार आहे आणि त्यावर साधारणता 2200 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि त्या योजनेत आमच्या तालुक्याचा समावेश करा यासंदर्भात लवकरच मंत्री गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार.
या योजनेत सोयगाव तालुक्यातील पळसखेडा (महानोर), वरखेडी बुद्रुक, वरखेडी खुर्द, जंगला तांडा, फर्दापूर, फर्दापूर तांडा, जामठी,पिंपळा, रवळा आणि जवळा या गावांमधून पाइपलाइन जात आहे. तसेच मूर्ती, घाणेगाव तांडा, मोलखेडा, हिवरी, नांदातांडा, देव्हारी, सावळदबारा, टिटवी आणि मोलखेडा या गावाच्या शेजारून सदरील योजनेचे काम सुरू आहे.
या परिसरातील अनेक गावांना पाण्याची मोठी गरज असून, योजनेच्या पाइपलाइनचा मार्ग या गावांमधून जात असतानाही स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील संबंधित गावांचा भागपूर उपसा सिंचन योजनेत समावेश करून येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या भागपुर योजनेतून जसे जामनेर तालुक्यातील कोरडे पाझर तलाव पाण्याने भरणार आहे तसेच त्या पद्धतीने सोयगाव तालुक्यातील सुद्धा कोरडे झालेले पाझर तलाव भरण्यात यावे यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन परिसराच्या कृषी विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घ्यावी व संबंधित गावांचा योजनेत समावेश करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती इद्रिस मुलतानी यांनी केली आहे.
या मागणीमुळे सोयगाव तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आशा निर्माण झाली असून, शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मंत्री महोदय श्री. गिरीश महाजन यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील संबंधित गावांना सिंचनाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
