बाजारगावजवळ जखमी हरणासाठी वनविभागाची दोन तास प्रतीक्षा; अखेर हर्षल भाऊ तिमाने पाटील व मित्रांनी दाखवली माणुसकी!*

*बाजारगावजवळ जखमी हरणासाठी वनविभागाची दोन तास प्रतीक्षा; अखेर हर्षल भाऊ तिमाने पाटील व मित्रांनी दाखवली माणुसकी!*

 

*नागपूर प्रतिनिधी ,जयश्री चव्हाण*

 

*वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; जखमी हरणाला स्वतःच्या व्यवस्थेतून नागपूरच्या TTC रुग्णालयात हलविले*

 

कळमेश्वर : दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बाजारगावजवळ एक हरीण जखमी अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, माहिती देऊनही तब्बल दोन तास उलटून गेले तरी वनविभागाचे वाहन किंवा संबंधित पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

जखमी हरणाला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असताना मदतीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या घटनेत विलंब का झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हर्षल भाऊ तिमाने पाटील व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत स्वतः ॲम्बुलन्सची व्यवस्था केली आणि जखमी हरणाला उपचारासाठी नागपूर येथील TTC रुग्णालयात हलविले.त्यांच्या या तत्परतेमुळे जखमी वन्यप्राण्याला उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.

 

हर्षल भाऊ तिमाने पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दाखवलेली माणुसकी, वन्यप्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.

 

मात्र, या घटनेमुळे कळमेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जखमी वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर संबंधित पथक किती वेळात घटनास्थळी पोहोचते, अशा परिस्थितीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे का आणि या प्रकरणात विलंब नेमका कशामुळे झाला, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि गौरक्षकांना कायदेशीर कारवाईची भीती वाटत असेल, तर ही परिस्थितीही गांभीर्याने तपासण्याची गरज आहे. वनविभाग आणि वन्यजीवांच्या मदतीसाठी कार्य करणारे नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे, जेणेकरून जखमी वन्यप्राण्यांना वेळेत उपचार मिळू शकतील.

 

आता वनविभागाला काही थेट प्रश्न!

 

– जखमी हरणाची माहिती मिळूनही दोन तासांपर्यंत संबंधित पथक घटनास्थळी का पोहोचले नाही?

– आपत्कालीन परिस्थितीत वन्यप्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वनविभागाकडे कोणती व्यवस्था आहे?

– या घटनेतील विलंबाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का?

– वन्यजीवांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळणार का?

 

हर्षल भाऊ तिमाने पाटील व त्यांच्या मित्रांनी केलेले कार्य कौतुकास्पद; मात्र वनविभागाच्या प्रतिसादातील कथित विलंबाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.वन्यप्राण्यांचे संरक्षण ही केवळ नागरिकांची नव्हे, तर संबंधित शासकीय यंत्रणेचीही महत्त्वाची जबाबदारी आहे.

 

वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने आपली आपत्कालीन यंत्रणा अधिक तत्पर व प्रभावी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *