कारधा पोलिसांची धडक कारवाई: कत्तलखान्याकडे जाणारी ७ गोवंश जनावरे जप्त; पिकअप वाहनासह ५.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त….!!
भंडारा : अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध कारधा पोलिसांनी रविवारी सायंकाळी मोठी कारवाई केली आहे. कारधा चौक परिसरात क्रूरतेने आणि दाटीवाटीने कोंबून नेली जाणारी ७ गोवंश जनावरे पोलिसांनी जप्त केली असून, आरोपी चालकाविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ५,३३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ ते ७:१० वाजताच्या सुमारास कारधा चौक ते पूर्वेकडे ३ किमी अंतरावर घडली. कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार त्र्यंबक दामोधर गायधने (ब. नं. ७३४) हे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना, त्यांना एका पिकअप वाहनातून अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आला.
पोलिसांनी बुलेरो पिकअप (क्र. MH-33-T-1777) थांबवून तपासणी केली असता, त्यात १ लाल रंगाची गाय, १ पांढऱ्या रंगाची गाय, १ काळ्या रंगाची गाय, १ काळ्या रंगाचा गोरा, १ काळ्या-पांढऱ्या रंगाचा गोरा, १ लहान लाल रंगाचा गोरा आणि १ लाल रंगाचा बैल अशी एकूण ७ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने कोंबलेल्या स्थितीत मिळून आली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहन चालक व मालक नेपाल दिलीप हटवादे (वय ३३ वर्षे, रा. बरडकिन्ही, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७६३/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीवर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (ई), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ९ व ३ (५) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ गोवंश जनावरे: एकूण किंमत रु. ३३,०००/-
बुलेरो पिकअप (MH-33-T-1777): अंदाजे किंमत रु. ५,०००,००/-
एकूण रु. ५,३३,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्हा महिला पोलीस हवादार भिवगडे (ब. नं. १०१८) यांनी दाखल केला असून, हि कारवाही कारधा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.गोकुल सूर्यवंशी साहेब यांचे मार्गदर्शनात त्यांचे चमूने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार सुरेश सिडाम (ब. नं. ४४१) करीत आहेत. कारधा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
