सगरोळीत नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सगरोळीत नवरात्रोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

सगरोळी, प्रतिनिधी : ‘आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश प्रत्यक्षात उतरवत नवरात्र दुर्गा महोत्सवाच्या औचित्याने सगरोळी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील अनेक नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत मोफत वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सगरोळी येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळील खालच्या मारोती मंदिर परिसरात हे शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी, आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि योग्य उपचारांबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा

शिबिरात नांदेड येथील नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवून रुग्णांची तपासणी केली. डॉ. संदीप मारोतीराव तुकडे (बाभळीकर), अस्थिरोग, आर्थ्रोस्कोपी व रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ, श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड यांनी हाडे व सांधेदुखीच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. साईबाबा माधवराव अंकुशकर (बिलोलीकर), एम.बी.बी.एस., एम.डी. (मेडिसिन), अष्टविनायक हॉस्पिटल, नांदेड यांनी फिजिशियन म्हणून रुग्णांची तपासणी केली. विविध आरोग्य समस्यांबाबत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा उपक्रम

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. माधव रामराव कटके (जनरल फिजिशियन) आणि त्यांचे चिरंजीव डॉ. अजय माधव कटके (एम.बी.बी.एस., जनरल फिजिशियन) यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामस्थांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सेवा व मार्गदर्शन उपलब्ध झाले.

नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. धार्मिक उत्सवाबरोबरच समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे, आयोजकांचे आणि सहकार्यकर्त्यांचे नवरात्र दुर्गा महोत्सव समिती, सगरोळी यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

सी टी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ॲड.डाॅ.प्रकाश जोशी, सगरोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *