कळमेश्वरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न; आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या हस्ते विकास कामांचा शिलान्यास
कळमेश्वर:
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अरविंद सहकारी बँकेच्या वतीने १२ व्या जागतिक योगदिनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्य अतिथी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनोहर कुंभारे, डॉ. राजीव पोतदार, अविनाश माकोडे, धनराज देवके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
क्षेत्राचे लोकप्रिय व विकासपुरुष आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी योग हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा भाग बनवण्याचा प्रेरक संदेश दिला. ते म्हणाले की, नियमित योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.
याप्रसंगी आमदार डॉ. देशमुख यांनी क्षेत्रातील विकास कामांची माहिती देताना सांगितले की, त्यांनी योग साधकांसाठी ‘योग भवन’ आणि वृद्धांसाठी ‘मनोरंजन केंद्र’ मंजूर केले आहे. तसेच, कळमेश्वरच्या १२५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ६०% काम पूर्ण झाले असून लिंगा येथील ‘कोळसा गॅसिफिकेशन’ व गोंडखैरी येथील ‘कोळसा खदान’ प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल.
कार्यक्रमादरम्यान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. तेजसिंह जगदाळे, डॉ. भाविक मनियार, मिथिलेश धिरडे, हंसराज मिश्रा,भाकर प्रधान, सुभाष पाटणकर, कृष्णा बगडे, वसंतराव केसरवानी, मोनिका राऊत आणि मंथन धमदे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या योग महोत्सवात ‘कळमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना’ व ‘मॉर्निंग मिशन ग्रुप’च्या सदस्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
