*फूड विभागाच्या धडक कारवाईने तंबाखू व्यावसायिकांमध्ये खळबळ*
*गोरेगावातील मिठाई दुकानांमधून नमुने संकलित; दूध डेअऱ्याही तपासणीच्या रडारवर*
=====================
गोरेगाव, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने (फूड विभाग) जिल्हाभरात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेमुळे अवैध खाद्यपदार्थ, भेसळयुक्त वस्तू आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. विभागाच्या वाढत्या सक्रियतेमुळे अनेक व्यावसायिक सतर्क झाले असून विविध भागांमध्ये तपासणी आणि नमुना संकलनाची मोहीम सुरू आहे.
माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवाईला अधिक गती मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. रावणवाडी, नवेगाव आणि गोंदिया परिसरात करण्यात आलेल्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिक तपासणीच्या कक्षेत आले असल्याची माहिती आहे.
*अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर विशेष लक्ष*
गोरेगाव तालुक्यात दीर्घकाळापासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीबाबत तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागाने अशा व्यवसायांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येत असून संशयित उत्पादनांची पडताळणी केली जात आहे.
काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले असले तरी पुढील कारवाईबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, विभागाकडून आवश्यक तपास अहवाल व पुराव्यांच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
*मिठाई दुकानांमधून नमुने तपासणीसाठी पाठविले*
गोरेगाव शहरातील विविध मिठाई दुकानांमधून खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि नियमांचे पालन झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता येणार आहे.
या कारवाईनंतर मिठाई व्यावसायिकांमध्येही सावधगिरी वाढली असून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
दूध डेअऱ्यांवरही विभागाची नजर
जिल्ह्यातील दूध डेअऱ्या आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवरही विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी वेळोवेळी नमुने घेतले जात असून ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ करून देणे हा विभागाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जाते.
गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे
