सेलू उड्डाणपुलाजवळ तरुणाला लुटणाऱ्या दोघांना अटक, कळमेश्वर पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा

सेलू उड्डाणपुलाजवळ तरुणाला लुटणाऱ्या दोघांना अटक, कळमेश्वर पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा

 

 

कळमेश्वर।

सेलू उड्डाणपुलाजवळ एका तरुणाला अडवून मारहाण करत रोख रक्कम आणि ऑनलाइन माध्यमातून पैसे लुटणाऱ्या दोन आरोपींना कळमेश्वर पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कटंगी तहसील अंतर्गत उमरी येथील रहिवासी 18 वर्षीय विशाल दीपक कावरे याने 19 ऑक्टोबर 2026 रोजी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी सेलू उड्डाणपुलाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी पैशांची मागणी करत विशाल याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर आरोपी त्याला चौदामैल येथील पेट्रोल पंपाजवळ घेऊन गेले, तिथे त्याच्याकडून 500 रुपये ऑनलाइन पाठवून घेतले आणि खिशातील 3 हजार रुपये रोख जबरीने काढून घेतले. याशिवाय मोबाईलवरून आणखी 2 हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडून त्याला बेदम मारहाण केली तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 उपकलम 4 आणि कलम 3 उपकलम 5 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वातील तपास पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 19 ऑक्टोबर 2026 रोजी चौदामैल परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर मारुती ओमकार, वय 24 वर्षे, राहणार सिद्धार्थ नगर, टेका नाका, नागपूर आणि अलमास युसुफ मंसूरी, वय 25 वर्षे, राहणार कॉटन मार्केट, रेल्वे स्थानकाजवळ, नागपूर अशी निष्पन्न झाली आहेत. पोलिसी चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *