ऊसतोडीसाठी गेलेल्या सावनेर तालुक्यातील दहा मजुरांची बीडमधून सुरक्षित सुटका; सामाजिक

ऊसतोडीसाठी गेलेल्या सावनेर तालुक्यातील दहा मजुरांची बीडमधून सुरक्षित सुटका; सामाजिक पुढाकार आणि पोलीस समन्वयाला य

 

माजलगाव परिसरात विषम परिस्थितीत काम करवून घेतल्याची तक्रार; मजुरांनी केलेल्या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

 

 

सावनेर:

सावनेर तालुक्यातील आजनी आणि खर्डुका परिसरातील दहा मजुरांना बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरातून सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांचा पुढाकार आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयामुळे या मजुरांची सुखरूप घरवापसी शक्य झाली. मजुरांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना ठरवून दिलेल्या कामाच्या ठिकाणापेक्षा दूर नेऊन कठीण परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले जात होते आणि त्यांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आले होते. मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी झोपडीच्या परिसरात कथितरीत्या विजेची तार सोडली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता याविषयी अधिकृत चौकशीची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकरा ऑक्टोबर रोजी आजनी येथील मजुरांना एका मालवाहू वाहनातून नेण्यात आले. त्यानंतर मनसर येथून अन्य दोन मजूर त्यांच्यासोबत जोडले गेले. मजुरांना केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर काम असल्याचे सांगून दिशाभूल करण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले. प्रत्यक्षात त्यांना बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरातील तेलगाव खुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेऊन विविध शेतांमध्ये ऊसतोडीच्या कामाला लावले गेले. तेथील परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या मजुरांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली, ज्यामुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

नातेवाइकांनी मदतीसाठी सावनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, त्यांना संबंधित भागात संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री उशिरा गावात परतलेल्या हवालदिल कुटुंबीयांनी मध्यरात्री अडीच वाजता सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांची भेट घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हितेश बनसोड यांनी तत्काळ सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्याशी संपर्क साधून कुटुंबीयांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. याशिवाय स्थानिक आमदार डॉ. आशिष देशमुख यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रियेला गती देण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सावनेरचे पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांनी मजुरांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन चौकशी केली. या चौकशीत मनसर येथील एका महिलेची माहिती समोर आली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनंतर संबंधित महिलेमार्फत माजलगाव येथे संपर्क साधून मजुरांना पोलीस ठाण्यात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले. अठरा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता हे सर्व दहा मजूर माजलगाव पोलीस ठाण्यात सुरक्षित पोहोचले. केवळ माहितीवर विसंबून न राहता हितेश बनसोड यांनी त्याच रात्री थेट माजलगाव गाठले आणि सर्व मजुरांची भेट घेऊन त्यांना स्वतःच्या वाहनातून सावनेर येथे सुरक्षित आणले.

सुरक्षित परत आलेल्या मजुरांमध्ये आजनी येथील गोलू चचाने, अनिल नराटे, अक्षय कातकडे, प्रकाश इरपाची, अश्विन राऊत, निकेश नेहारे, निलेश इरपाची, अजय कातकडे तसेच खर्डुका येथील सुधीर राजूके आणि नितीन वाघाडे यांचा समावेश आहे. संकटसमयी तातडीने धाव घेऊन मजुरांना परत आणण्यासाठी हितेश बनसोड यांनी बजावलेल्या भूमिकेचे सावनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजू घुगल यांनी कौतुक केले. या यशस्वी सुटकेसाठी हितेश बनसोड यांनी नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांचे विशेष आभार मानले.

रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांची अधिकृत नोंद असणे आवश्यक असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी हितेश बनसोड यांनी केली आहे. दरम्यान, त्याच परिसरात मध्यप्रदेशातील बैतूल येथील आणखी पाच कामगार अडकले असल्याची माहिती समोर आली असून, त्यामध्ये बोलता न येणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते. त्या मजुरांच्या सुरक्षिततेबाबतही प्रशासनाने तातडीने माहिती घेऊन शोधमोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *