करडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ८२,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी (भंडारा): पोलीस स्टेशन करडी अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका घरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ८२,७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, करडी पोलिसांनी पालोरा येथील नितीन रतनलाल मेश्राम यांच्या राहत्या घरी छापा टाकला. घराच्या बेडरुममध्ये आरोपी पत्त्यांच्या साहाय्याने पैशांवर जुगार खेळताना आढळले.
या आरोपींवर झाली कारवाई:
१. नितीन रतनलाल मेश्राम (वय ४० वर्ष, रा. पालोरा)
२. चंद्रमनी अशोक खोब्रागडे (वय ३६ वर्ष, रा. पालोरा)
३. प्रगत प्रमोद तिरपुडे (वय ३८ वर्ष, रा. पालोरा)
४. सरविंद प्रेमलाल कडाम (वय ३९ वर्ष, रा. पालोरा
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील वस्तू जप्त केल्या आहेत:
रोख रक्कम: जुगाराच्या डावावरील व अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम.
मोबाईल: रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा (किंमत १०,००० रु.) आणि रियलमी कंपनीचा आकाशी रंगाचा (किंमत १०,००० रु.) असे दोन मोबाईल.
दुचाकी: हिरो कंपनीची पॅशन एक्स प्रो (किंमत ६०,००० रु.).
जुगाराचे साहित्य आणि हिशोबाच्या चिठ्ठ्या.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक १५७/२०२६, महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, आयडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरताडे व करडी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
