दिव्यांग क्रिकेट कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी कुमार मसराम यांची नियुक्ती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिव्यांग क्रिकेट कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक कुमार मसराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुमार मसराम यांच्या नियुक्तीची माहिती मिळताच चंदू मडावी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मसराम यांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
दिव्यांग खेळाडूंमधील क्रीडा प्रतिभेला वाव देणे, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यविकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कुमार मसराम यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीकडे क्रीडा क्षेत्रातून अपेक्षेने पाहिले जात आहे. त्यांच्या माध्यमातून दिव्यांग क्रिकेटला प्रोत्साहन मिळण्यासह खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक प्रयत्नांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मसराम यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि परिचितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून दिव्यांग क्रिकेटच्या विकासाला हातभार लागेल, अशी आशा व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
