पारशिवणीत अवैध वाळू तस्करीवर पोलिसांचा छापा, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पेंच नदी पात्रातून होत होते अवैध उत्खनन; चालक आणि वाहन मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल
पारशिवणी :
पारशिवणी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली रंगेहात पकडली आहे. या कारवाईत एक ब्रास वाळूसह सुमारे तीन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पारशिवणी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना, ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सतर्क होत शोध मोहीम राबवली. त्यावेळी तकिया मारुती मंदिर परिसराकडून संशयास्पदरीत्या येणारा एक ट्रॅक्टर पोलिसांनी अडवला. पंचांसमक्ष विचारपूस केली असता, चालकाने आपले नाव सूर्यभान महीपतराव तिरकमठे, वय ५० वर्षे, राहणार पालोरा, वार्ड क्रमांक १, तालुका पारशिवणी, जिल्हा नागपूर असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४० बीजे ८३८० आणि त्यास जोडलेल्या ट्रॉली क्रमांक एम एच ४० डी ई ०८३७ मध्ये अवैधरीत्या भरलेली वाळू आढळून आली. पोलिसी खाक्या दाखवून अधिक चौकशी केली असता, चालक सूर्यभान याने वाहन मालक खुशाल महादेव बडवाईक, राहणार पारशिवणी याच्या सांगण्यावरून पेंच नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून तिची वाहतूक करत असल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी पंचांसमक्ष साडेतीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच सहा हजार रुपये मूल्याची एक ब्रास वाळू असा एकूण तीन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पारशिवणी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३ उपकलम २, कलम ४९ सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ उपकलम ७ व ८, खाण व खनिज विकास व विनियमन अधिनियम कलम ४ व २१ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
