नागपूर ग्रामीण पोलीस दलाची ‘सर्व कर्मचारी संवाद बैठक’ संपन्न;
प्रलंबित प्रश्न आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांवर चर्चा..
नागपूर:
नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ मे २०२६ रोजी पोलीस भवन, नागपूर येथे ‘सर्व कर्मचारी संवाद बैठक’ (All Hands Meet) पार पडली. या बैठकीत पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवाद बैठकीचा मुख्य उद्देश पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवणे हा होता. बैठकीत खालील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली:
फॉरेन्सिक पुराव्यांचे जतन: गुन्ह्यांच्या तपासामध्ये रक्ताचे नमुने आणि इतर जैविक पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यांचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फ्रीजरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
पर्यावरणपूरक उपक्रम: पोलीस विभागात पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
शिस्त आणि समन्वय: पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अधिकारी आणि अंमलदार यांच्यात योग्य समन्वय असणे आणि शिस्त पाळणे यावर भर देण्यात आला.
या बैठकीला पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती पुजा गायकवाड, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी, पोलीस मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून कामकाजातील अडचणी सोडवण्याचे आश्वासन मा. पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिले.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
