*जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या माध्यमातून २६४ वे मरणोत्तर देहदान*
*वाकोद प्रतिनिधी…. दीपक गायकवाड…८३ वर्षीय भागाबाई पाटील यांचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला सुपूर्द; जळगाव जिल्ह्यातील तिसरे देहदान*
भोजे (ता. पाचोरा) : हिंदू संस्कृतीमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्नदान, रक्तदान, नेत्रदान यांसह देहदान हे मानवतेच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ आणि समाजोपयोगी दान मानले जाते. मृत्यूनंतरही आपला देह समाजाच्या उपयोगी यावा आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन व प्रत्यक्ष अभ्यासासाठी मदत व्हावी, या उदात्त हेतूने पाचोरा तालुक्यातील भोजे येथील ८३ वर्षीय भागाबाई तुकाराम पाटील यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा देह जळगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केला.
*जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज* यांच्या प्रेरणेने नाणीज संस्थानच्या माध्यमातून आतापर्यंत २६४ मरणोत्तर देहदान करण्यात आले आहेत. संस्थानच्या या सेवाकार्यातील हे २६४ वे देहदान असून जळगाव जिल्ह्यातील हे तिसरे देहदान ठरले आहे.
समाजात आजही धार्मिक समजुती, परंपरा आणि काही गैरसमजांमुळे देहदानाबाबत संकोच दिसून येतो. मात्र, देहदान हे वैद्यकीय क्षेत्रासाठी किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव समाजाला होणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी देहाची आवश्यकता असते. शरीररचना विभागात देह उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना मानवी शरीरातील विविध अवयवांची रचना, त्यांचे कार्य आणि शरीरशास्त्र समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष अभ्यासाची अमूल्य संधी मिळते. त्यामुळे भविष्यातील डॉक्टरांच्या शिक्षणाला आणि वैद्यकीय संशोधनाला मोठे योगदान मिळते.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक कुटुंबे या महान कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. मृत्यूनंतरही आपला देह दुसऱ्यांच्या ज्ञानासाठी आणि समाजाच्या आरोग्यसेवेसाठी उपयोगी पडावा, ही भावना देहदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. भागाबाई पाटील यांच्या देहदानामुळे समाजासमोर मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.
देहदान प्रसंगी उपस्थित कुटुंबीय : (सून)सूर्यकांताबाई मोतीलाल पाटील, द्वारकाबाई रामलाल पाटील, (नातू )वसंत मोतीलाल पाटील, योगेश रामलाल पाटील, लक्ष्मीबाई राजेंद्र हिवाळे, सरस्वतीबाई नकुल जाधव, सावित्रीबाई तुकाराम घोंगडे, सोनाली तुकाराम सोनवणे, कविता सुरेश कदम, अर्चना योगेश पाटील, रूपाली वसंत पाटील, प्रथमेश योगेश पाटील व भावेश योगेश पाटील आदी नातेवाईक उपस्थित होते.
संस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते : डिगंबर टोके (अंतर्गत लेखा परीक्षक), विठ्ठल दांगोडे (प्रसिद्धी व मूल्यांकन समिती सदस्य), उषाताई कोळी (महिला जिल्हाध्यक्ष), विनोद पाटील (जिल्हा सचिव), अरुण सुर्वे (जिल्हा कर्नल), राकेश बाविस्कर (जिल्हा युवा प्रमुख), नरेंद्र खाचणे (श्रीकथा प्रमुख, उत्तर महाराष्ट्र उपपीठ), मनोज सोनवणे (माजी जिल्हाध्यक्ष), प्रदीप पाटील (तालुकाध्यक्ष, पाचोरा), गोविंदा महाजन, कृष्णा जाधव, ममताबाई पाटील, श्रीकृष्ण उभाळे, अनिल उभाळे, अरुण पाटील, भास्कर माळी, गंगाराम राऊत, प्रतिभा राऊत, रंजना उभाळे, हर्बल उभाळे, शुभम देव, श्रीराम पाटील, संतोष बाविस्कर, संतोष पाटील, दत्तू गवरे, बाळू पल्हाळ, आशा दांगोडे आणि प्रतिभा जठार यांच्यासह जळगाव जिल्हा सेवा समिती, पाचोरा तालुका सेवा समिती, भोजे सेवा केंद्र समिती तसेच रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मृत्यूनंतरही देह समाजाच्या उपयोगी पडावा, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि भविष्यातील रुग्णसेवेला हातभार लागावा, हा देहदानामागील उदात्त विचार आहे. भागाबाई पाटील यांचे देहदान समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे असून देहदानाबाबतचे गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
