*वर्षा तुरकर हत्याकांडाचा थरारक उलगडा! पतीच्या मैत्रिणीच्या हत्येसाठी पत्नीनेच रचला कट?*
*१३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासातून आरोपींचा माग काढला, पत्नीसमेत चौघे ताब्यात तर दोघांचा शोध सुरू*
गोंदिया : बोंडराणी येथील जंगल परिसरात एअर होस्टेस वर्षा तुरकर हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या बहुचर्चित हत्याकांडाचा अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केल्याचा दावा केला आहे. पतीचे मृतक महिलेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पत्नीनेच पतीच्या मैत्रिणीला संपविण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या हत्येसाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचेही पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या प्रकरणात पत्नीसमेत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी आलेल्या वर्षाची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५, रा. धानोरी, जिल्हा पुणे) ही दिवाळीच्या सुट्टीत आपल्या माहेरी मौजा किन्ही, ता. खैरलांजी, जि. बालाघाट येथे आली होती. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी ती गोंदिया येथील आपला मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेली होती. तेथून परत येत असताना बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी वर्षावर चाकूने पोटावर व पाठीवर वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी डवनीवाडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५५०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहा पथके, चार दिवसांचा तपास आणि २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने गुन्ह्याचा उलगडा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी सहा स्वतंत्र पथके तयार केली.
या पथकांनी घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी, बालाघाट ते गोंदिया अशा मार्गांवरील जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागील चार दिवसांतील फुटेज तपासली. या तपासादरम्यान तीन संशयित इसम मोटारसायकलवरून मृतक वर्षाचा मित्र नितेश अग्रवाल याच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करताना दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मौजा मुरी, गोंदिया येथून इमरान करीम शेख (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता या हत्याकांडामागील कथित कट उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३ लाखांच्या सुपारीचा धक्कादायक दावा
पोलिसांच्या तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि मृतक वर्षा तुरकर यांच्यातील कथित प्रेमसंबंधांमुळे नितेशची पत्नी अस्वस्थ होती. या कारणावरून तिने आपल्या घराजवळ राहणाऱ्या कुणाल कुंभलकर याच्या मदतीने वर्षाला जिवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
कुणाल कुंभलकर याने कथितरीत्या शाहरुख पठाण याच्याशी संपर्क साधून वर्षा तुरकर हिच्या हत्येसाठी १३ लाख रुपयांची सुपारी निश्चित केली. त्यानंतर शाहरुख पठाण याने आपल्या परिचयातील मुरी येथील इमरान करीम शेख, नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत यांच्यावर हत्येची जबाबदारी सोपविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
जीपीएस लोकेशनच्या आधारे आखला हत्येचा कट
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक भाग म्हणजे वाहनाच्या जीपीएस लोकेशनचा वापर. पोलिसांच्या माहितीनुसार, नितेश अग्रवाल याची चारचाकी गाडी त्याच्या पत्नीच्या नावावर होती. या वाहनातील टोयोटा आय-कनेक्ट अॅपच्या माध्यमातून गाडीचे लोकेशन मिळविण्यासाठी नितेशच्या पत्नीने कथितरीत्या आरोपींना आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिले होते.
या अॅपच्या मदतीने नितेशच्या वाहनाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.
नितेश बालाघाटच्या दिशेने गेल्यानंतर तिन्ही आरोपी मोटारसायकलने त्याच्या गाडीचा पाठलाग करू लागले. जीपीएस लोकेशनच्या आधारे ते बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात पोहोचले. तेथे वर्षा तुरकर हिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पत्नीसमेत चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या हत्याकांडात पोलिसांनी खालील चार जणांना ताब्यात घेतले आहे.
१) इमरान करीम शेख (वय २६) – रा. संजयनगर, मुरी, जि. गोंदिया.
२) शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय ३३) – रा. सिंधी कॉलनी, गोंदिया.
३) कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१) – रा. साई मंदिराजवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया.
४) सौ. मोना नितेश अग्रवाल (वय ४१) – रा. साई मंगलम लॉनसमोर, गोविंदपूर रोड, गोंदिया.
या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी डवनीवाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
एसपी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे, अभिषेक जंगमवार, सफौ राजू मिश्रा, पोलीस हवालदार इंद्रजीत बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, सोमेंदसिंह तुरकर, रियाज शेख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सुजित हलमारे, शैलेश निनावे, राकेश इंदुरकर, हंसराज भांडारकर, सुनील उहाके, करण बारेवार, निखिल मेश्राम, छगन विठ्ठले, महिला पोलीस कर्मचारी स्मिता तोंडरे, राम खंडारे, विलेश ठाकरे, इमरान सय्यद, मुरली पांडे तसेच सायबर सेलचे रोशन येरणे आणि आकिब काझी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सुपारीच्या पैशांचा व्यवहार आणि फरार आरोपींच्या भूमिकेकडे लक्ष
वर्षा तुरकर हत्याकांडाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी या प्रकरणात अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कथित १३ लाख रुपयांची सुपारी नेमकी कशा पद्धतीने ठरविण्यात आली? पैशांचा व्यवहार झाला होता काय? फरार असलेल्या दोन आरोपींची नेमकी भूमिका काय होती? तसेच हत्येचा कट आखण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत कोणाची किती भूमिका होती? या सर्व बाबींचा पुढील तपासात उलगडा होण्याची शक्यता आहे.
