नागपूर ग्रामीण पोलिसांची चौफेर घेराबंदी: गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी घट, ‘दामिनी पथका’च्या सतर्कतेमुळे महिला सुरक्षेला नवे बळ

नागपूर ग्रामीण पोलिसांची चौफेर घेराबंदी: गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी घट, ‘दामिनी पथका’च्या सतर्कतेमुळे महिला सुरक्षेला नवे बळ

 

 

 

अत्याचाराच्या शंभर टक्के गुन्ह्यांची उकल; ११.५५ कोटींहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त, २३२ सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

 

 

नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस दलाने राबवलेल्या विशेष मोहिमांना मोठे यश मिळाले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभावी कारवाईमुळे सन २०२४ आणि २०२५ च्या तुलनेत यंदा गंभीर गुन्ह्यांचा आलेख लक्षणीयरीत्या खाली आला आहे.

पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ३३ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर खुनाच्या घटनांमध्ये २९ टक्के, दुचाकी चोरीत २२ टक्के, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांत १२ टक्के, तर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये ६ टक्के घट झाली आहे.

महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देताना ग्रामीण पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल झालेल्या अत्याचाराच्या सर्व गुन्ह्यांची शंभर टक्के उकल करत सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागांत कार्यरत असलेली ‘दामिनी पथके’ शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे आणि पर्यटन स्थळांवर नियमित गस्त घालत आहेत. या धडक मोहिमेमुळे विनयभंगाच्या गुन्ह्यांत ९ टक्के घट होऊन सन २०२४ मधील १९३ आणि २०२५ मधील १९५ गुन्ह्यांच्या तुलनेत हा आकडा १४४ वर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाइनबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या मोहिमेत पोलिसांनी ऑक्टोबरअखेर ११.५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये ६०१ गुन्हे दाखल करून ५ कोटी ७० लाख ८४ हजार ७१७ रुपये किमतीचा ८४२.५४० किलो गांजा, ६.०६९ किलो गांजाची झाडे, ६९३.२७४ ग्रॅम एमडी, ३६.२९३ किलो अफू, ६.९ ग्रॅम हेरॉईन, १४५ किलो डोडा पावडर आणि ट्रामाडोलच्या १५,८१४ गोळ्या जप्त केल्या आहेत. दुसरीकडे, अवैध जुगाराच्या ८०४ प्रकरणांत २ कोटी ७० लाख ८५ हजार ९९३ रुपये आणि दारूबंदी कायद्यांतर्गत ३,५४३ गुन्ह्यांत ३ कोटी १४ लाख १९ हजार ६११ रुपये असा एकूण ५ कोटी ८५ लाख ५ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हे घडण्यापूर्वीच त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १०,४४४ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या असून, हे प्रमाण मागील वर्षाच्या ९,४२५ कारवायांच्या तुलनेत १०.८१ टक्क्यांनी अधिक आहे. अट्टल गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी मकोका कायद्याच्या १५ प्रकरणांत ७८ आरोपींवर, एमपीडीए अंतर्गत ३० आरोपींवर आणि पीआयटी एनडीपीएस कायद्यान्वये २ आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय २३२ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, नागरिकांनी कोणत्याही अवैध व्यवसायाची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती निसंकोचपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *