मेहकर-चिखली रोडवर महसूल विभागाच्या ताफ्यावर ‘दरोडेखोरांचा’ भीषण हल्ला!
लव्हाळा जवळील आमखेड फाटा रात्री ११:१५ वाजता
मेहकर-चिखली रोडवरील लव्हाळा जवळील आमखेड फाटा परिसरात आज रात्री थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे क्रीडा स्पर्धेसाठी गेलेले मेहकर आणि लोणार तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावून परतत असताना, चोरट्यांनी त्यांच्या ५ ते ६ वाहनांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली.
धावत्या गाड्यांवर अचानक दगडफेक करून चालकाचे नियंत्रण सुटावे आणि त्यानंतर लुटमार करता यावी, या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर येत आहे. या भ्याड हल्ल्यात वाहनांच्या काचा फुटून प्रचंड नुकसान झाले असून, एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला काच लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या मार्गावर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
प्रतिनिधी – साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा
