छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच आता जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगर परिषद, नगर पंचायती आणि महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे निवडणूक आहे पारदर्शकपणे पार पडतील, या संदर्भात घ्यावयाच्या काळजीच्या दृष्टीने सूचना केल्या.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकांसाठी 5 हजार 24 मतदान यंत्रे आणि 2 हजार 512 कंट्रोल युनिट लागणार आहेत. ही यंत्रे नांदेडहून मागविले जाणार आहेत. जिल्हास्तरावर प्राथमिक पडताळणी केल्यानंतर नियंत्रण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली जातील.
जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी जिल्हाभरात 2282 मतदान केंद्रांवर 18 लाख 73 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते नोंदवावी लागतील. या निवडणुकीसाठी एक जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर दहा हजार 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, जिल्ह्यात एकूण 12 हजार मनुष्यबळ उपलब्ध आहे. या सर्वांना प्रशिक्षणासह प्रशासकीय प्रक्रिया देखील पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात नऊ निवडणूक निर्णय अधिकारी आणि नऊ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या सर्व प्रक्रियेवर जिल्हास्तरीय कार्यालयातून नियंत्रण ठेवले जाईल, अशी माहिती ही स्वामी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांची उपस्थिती होती.
