भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले घाणमुख अपहार प्रकरणी अभियंता प्रवीण सलामेसह ५ जणांवर फौजदारीचे आदेश
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
शासकीय निधीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचा जोरदार दणका दिला आहे. ग्रामपंचायत घाणमुख येथे एकही विकासकाम न करता लाखोंचा निधी हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात अभियंता प्रवीण सलामे यांच्यासह पाच जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना हे कठोर निर्देश दिले आहेत.
जागरूक नागरिक राम जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
हे संपूर्ण प्रकरण घाणमुख येथील जागरूक नागरिक श्री. राम जाधव यांच्यामुळे चव्हाट्यावर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेऊन जनतेचा पैसा लाटणाऱ्या या टोळीविरोधात जाधव यांनी सातत्याने तक्रारी करून पुराव्यांसह भ्रष्टाचार उघड केला. त्यांच्याच तक्रारीची दखल घेत प्रशासनाने चौकशी समिती नेमली, ज्यामध्ये या पाचही जणांवर दोष निश्चित करण्यात आला आहे.
केवळ गुन्हे नको, ‘बडतर्फी’चीच गरज
प्रवीण सलामे सारख्या अभियंत्यांनी पदाचा गैरवापर करून ‘करोडोंची माया’ जमवल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. केवळ कागदोपत्री कामे दाखवून शासनाची लूट करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे, अशा भ्रष्ट अभियंत्यांवर केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांना तातडीने शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
शासनाचा निधी हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. तो हडप करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. हा निर्णय भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कारवाईमुळे भ्रष्ट साखळीत खळबळ
या धाडसी कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राम जाधव यांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक होत असून, आता पोलीस प्रशासनाकडून या पाचही जणांच्या अटकेकडे गट विकास अधिकारी वरिष्ठाच्या आदेशानुसार गुन्हेगारीत कोणते पाऊल उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
