सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्रासह फिरणाऱ्या तरुणाला बेड्या
भंडारा:
सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आणि धारदार शस्त्रासह शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला भंडारा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई चांदणी चौक परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून लोखंडी चाकू जप्त केला आहे.
भंडारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपल्या पथकासह शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, चांदणी चौक परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याकडे घातक शस्त्र आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून धाड टाकली.
या कारवाईत अमन अनिल सोनेकर (वय ३२ वर्षे, रा. इंदिरा गांधी वार्ड, चांदणी चौक, भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीचा एक टोकदार आणि धारदार लोखंडी चाकू मिळून आला. आरोपी कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी वावरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी विरुद्ध भंडारा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १२४४/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ आणि सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बेदुरकर व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
