*ग्रामीण विकासाला चालना देणारे*
*कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी समारोपाची सगरोळीत सांगता*
बिलोली (प्रतिनिधी) जयप्रकाश गोणशेटवाड
संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी १९५९ पासून अहोरात्र झटलेले कर्मयोगी बाबासाहेब (के. ना.) देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा गौरवशाली समारोप सोहळा येत्या रविवार, २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सगरोळी येथील बजरंग मैदान, शारदानगर येथे सकाळी १०:३० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे असल्याची माहिती संस्थेचे कार्यकर्ते अभिजित महाजन,मुख्याध्यापक संभाजी गायकवाड,आनंद कुलकर्णी यांनी बिलोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण समाजाच्या उत्थानासाठी कर्मयोगी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या या महान कार्याची स्मृती आणि विचारांचा वारसा जपण्यासाठी वर्षभर संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांची सांगता आता एका भव्य सोहळ्याने होत आहे.
*प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन*
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सद्गुरु माणिकप्रभू महाराज (माणिकप्रभू संस्थान, माणिकनगर, जि. बिदर) भूषवणार आहेत. तसेच, प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.याचवेळी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा पोहचवणाऱ्या बाबासाहेबांच्या या कृतज्ञता सोहळ्याला नांदेड जिल्ह्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्ष समारोप संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी पत्रकार मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
