तुमसर येथे २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन…!!
तुमसर:महसूल विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासन निर्णयानुसार तुमसर विधानसभा क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत तहसील कार्यालय, तुमसर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबवले जाणार आहे.शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणार महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सहजतेने पोहोचावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे तसेच माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एकाच दिवशी या समाधान शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तुमसर उपविभागीय अधिकाऱ्यांचे निमंत्रण या विशेष अभियानांतर्गत तुमसर येथील शिबिराचे नियोजन पूर्ण झाले असून, तुमसरचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) गणेश दिवे यांनी सर्व माध्यम प्रतिनिधी आणि वृत्तपत्र प्रतिनिधींना या शिबिरास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. या कार्यक्रमाची माहिती भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
