*जलालखेडा पोलीस ठाण्यांतर्गत मौजा बानोरचंद्र येथील शेतात अवैध दारू बनविणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर ०३ गुन्हे दाखल; ६६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*
दिनांक ०१/०८/२०२६ रोजी माननीय श्री हर्ष ए. पोद्दार (वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण) आणि श्री अनिल म्हस्के (अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री पराग पोटे (उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल) यांच्या नेतृत्वात, सहायक पोलीस निरीक्षक श्री पवन भांबुरकर (प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे जलालखेडा) यांच्यासह जलालखेडा पोलिसांनी एक विशेष मोहीम राबविली. जलालखेडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौजा बानोरचंद्र (ता. नरखेड) येथील शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात अवैध दारू तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत जलालखेडा पोलिसांनी अवैध दारू बनविणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई करत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यामध्ये आरोपी क्र. १) बलवंतसिंग लडुसिंग बावरी, २) विजयसिंग जतनसिंग भोंडे आणि ०१ महिला आरोपी (तिघेही रा. बानोरचंद्र, ता. नरखेड) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १०५ लिटर मोहाफुलाची दारू (किंमत १०,५००/- रुपये), १००० लिटर मोहाफुल सडवा (किंमत ५०,०००/- रुपये), देशी दारूचे एकूण ३० निपा (प्रत्येक ९० मिली, किंमत १,२००/- रुपये) आणि पाच रिकामे लोखंडी पिंप (प्रत्येकी किंमत १,०००/- रुपये प्रमाणे एकूण ५,०००/- रुपये), असा एकूण ६६,७००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशवंत माल घटनास्थळीच पंचनामा करून नष्ट करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
