देगलूरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
देगलूर, दि. २० जुलै :
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच लोकशाही, शिक्षणाचा अधिकार आणि जनहिताच्या विविध मागण्यांसाठी आज देगलूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर असा काढण्यात आला. मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी, देगलूर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चामध्ये विविध सामाजिक, राजकीय व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री. महेश पाटील यांनी आंदोलनात उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.
यावेळी शेतकरी संघटनेचे कावळगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत लोकशाहीच्या रक्षणासाठी शांततामय जनआंदोलनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिवसेना उबाठा चे संपर्क प्रमुख देगलूर श्री..पाटील सोमुरकर उपास्थित होते तसेच अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पाटील बेंम्बरेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चादरम्यान “We Stand With Sonam Wangchuk”, “शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार” अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची आणि जनहिताच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली.
शांततेत पार पडलेल्या या मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने उपजिल्हाधिकारी, देगलूर यांना निवेदन देऊन शासनाने संबंधित मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
