वक्फ मालमत्ता प्रकरणी १४ ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा

*वक्फ मालमत्ता प्रकरणी १४ ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा;*

*प्रशासनाने तहसीलदारांना तातडीच्या कार्यवाहीचे आदेश*

 

जिंतूर प्रतिनिधी:- मनोज टाक

 

जिंतूर येथील वक्फ संस्था जामा मस्जिद मजारशहा आरेफ साहेब यांच्या सेवा इनाम व वक्फ मालमत्तेशी संबंधित सर्वे क्रमांक १४, १७, १८, २९, ३०, ११०, २१६, २२३, २२४ तसेच मौजे वरूड (नृसिंह) येथील गट क्रमांक ५९ व ६० यांच्या सातबारा उताऱ्यावरील मालकी रकान्यात शासन निर्णय व सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित वक्फ संस्थेचे नाव नोंदविण्याबाबत अंतिम निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शेख अहेमद शेख समद व पठाण हारुण खान अबदार खान यांनी १४ ऑगस्ट २०२६ पासून तहसील कार्यालय, जिंतूर येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

या संदर्भात अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये तहसीलदार, जिंतूर यांना संबंधित निवेदनाची प्रत पाठवून प्रकरणातील लागू असलेले शासन निर्णय, नियम, कायदे, शासन अध्यादेश तसेच न्यायालयीन आदेश (लागू असल्यास) विचारात घेऊन नियमानुसार तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच निवेदनकर्त्यांशी संवाद साधून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन जिंतूर यांनाही पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सन २०२१ पासून या प्रकरणात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, शासन निर्णय व विविध अधिकाऱ्यांच्या आदेशांनंतरही संबंधित महसूल अभिलेखांमध्ये आवश्यक ती नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने अंतिम निर्णय घेऊन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, अतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे या प्रकरणात प्रशासनाने अधिकृतरीत्या दखल घेतली असून, आता तहसील प्रशासनाकडून पुढील काय कार्यवाही होते, याकडे संबंधित नागरिक आणि निवेदनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.I

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *