भोंदूबाबा चा अनिस कार्यकर्त्यावर सिटी इंडिया न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांचा वर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न 

भोंदूबाबा चा अनिस कार्यकर्त्यावर सिटी इंडिया न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांचा वर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

कठोर कार्यवाही व संरक्षणाची मागणी

अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बनावट चमत्कारांविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सहकार्यवाह तथा पत्रकार कमलाकर चंद्रकांत जमदाडे यांनी स्वतःवर पूर्वनियोजित जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला असून, याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

फिर्यादीनुसार, काही महिन्यांपूर्वी बडूर येथील भोंदूबाबा प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कमलाकर जमदाडे हे तक्रारदार व साक्षीदार आहेत. त्या प्रकरणाचा राग मनात धरून आरोपीने सूडबुद्धीने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

रस्ता अडवून चाकूसदृश वस्तूने वाराचा प्रयत्न

 

२५ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिलोलीहून रुद्रापूरकडे जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून पाठलाग केला. कासराळी-रुद्रापूर मार्गावरील शेताजवळ अचानक मोटारसायकल आडवी घालून रस्ता अडविल्यानंतर चाकूसदृश वस्तूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. प्रसंगावधान राखत मोटारसायकल पुढे दामटल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

 

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अर्वांच्य भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

व्हॉट्सअॅप स्टेटसवरून पूर्वनियोजित कटाचा संशय

 

घटनेपूर्वी आरोपीने व्हॉट्सअॅप स्टेटसवर “तेरा आज आखरी दिन होगा” असा मजकूर ठेवला होता, तसेच घटनेच्या दिवशी भोंदूबाबा ने रुद्रापूर येथे जाऊन फिर्यादीच्या येण्या-जाण्याची माहिती घेतल्याचे काही स्थानिकांनी सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

पोलीस संरक्षणाची मागणी

 

फिर्यादीने आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी व इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटीव्ही, मोबाईल कॉल डिटेल्स व व्हॉट्सअॅप स्टेटसची तपासणी करून पुरावे जप्त करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने पोलीस संरक्षण देण्याची विनंतीही अर्जात करण्यात आली आहे.

 

तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार

 

सदर प्रकरणात फिर्यादीने गंभीर आरोप केले असून, या आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.वृत्त लिहिपर्यंत गुन्हेनोंद प्रक्रिया सुरु झाली असून पोलीस प्रशासन याप्रकरणी कोणती भूमिका घेते आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी. जयप्रकाश गोणशेटवाड. बिलोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *