*कळमेश्वर पोलिसांची धडक कारवाई: गोंडखैरी पारधी बेड्यात अवैध दारू अड्ड्यांवर छापे, १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त*
:कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा गोंडखैरी पारधी बेडा परिसरात पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २६ जुलै २०२६ रोजी करण्यात आली.
नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सागर खर्डे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. जिल्हागस्ती दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर, कळमेश्वर पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने संयुक्तपणे गोंडखैरी पारधी बेडा परिसरात विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर सलग छापे टाकण्यात आले. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३६०० लिटर मोहफूल सडवा आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १,३५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील नाशवंत मुद्देमाल मौक्यावरच पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
