बिलोली पंचायत समितीतील घरकुल विभागाचा भोंगळ कारभार; सात-सात वर्षे बिले रखडल्याने लाभार्थी संतप्त
बोगस लाभार्थ्यांवर निधीचा वर्षाव, तर पात्र लाभार्थ्यांना न्याय कधी?
बिलोली, प्रतिनिधी : बिलोली पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत मोठा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप होत असून, २०१८ ते २०२६ या कालावधीत घरकुल मंजूर झालेल्या अनेक पात्र लाभार्थ्यांची बिले अद्यापही प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर ताण घेत घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले. मात्र, अनेक वेळा पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवून, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन आणि वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार आहे. सात-सात वर्षे उलटूनही बिले न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.
याउलट, तालुक्यातील काही कथित बोगस लाभार्थ्यांच्या नावावर मात्र निधीचा वर्षाव होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून, या प्रकारामुळे घरकुल योजनेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता मौन बाळगल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष अधिकच वाढत आहे.
विशेष म्हणजे, घरकुल विभागातील संबंधित अभियंता पत्रकारांचे दूरध्वनीही स्वीकारत नसल्याची तक्रार समोर आली आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत जबाबदार अधिकाऱ्यांनी अशी भूमिका घेणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
घरकुल ही गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे व अनियमित कारभारामुळे पात्र लाभार्थ्यांना न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र बिलोली तालुक्यात दिसून येत आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बोगस लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, पात्र लाभार्थ्यांची रखडलेली बिले तातडीने अदा करावीत आणि जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी लाभार्थी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रातिनिधी जयप्रकाश गोणशेटवाड बिलोली.
