श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसीत भव्य रक्तदान शिबिर: ८५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी
श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था संचालित श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी (स्वायत्त), कामठी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि जीएसके ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, ३० जुलै २०२६ ला भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
“युवाशक्तीचा संकल्प, जीवनाची सेवा – प्रत्येक थेंब म्हणजे दिलेले वचन” आणि “एक रक्तदान वाचवू शकते ३ जीव” या उदात्त ध्येयाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मिलिंद जे. उमेकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक कार्यात तरुणांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देत नियमित स्वेच्छा रक्तदान करण्याचे आवाहन केले. जीएसके ब्लड बँकेच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने सुरक्षितता आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून हे शिबिर पूर्ण केले.
या शिबीराला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला. शिबिरात ८५ रक्त दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना अल्पोपहार देण्यात आला तसेच त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुर काळे व डाॅ. सुप्रिया शिधये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयकांनी केले. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम
