दुधना नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक; बोरी पोलिसांची धडक कारवाई ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा

*दुधना नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक; बोरी पोलिसांची धडक कारवाई ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल*

 

बोरी | प्रतिनिधी मनोज टाक

 

दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात बोरी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ६ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कांताराम कानडे (वय २२, रा. पिंपळगाव गायके, ता. जिंतूर, जि. परभणी) हा दुधना नदीपात्रातून अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे आयसर वाहन, १ लाख रुपये किमतीची पिवळ्या-शेंदरी रंगाची ट्रॉली तसेच ५ हजार ५०० रुपये किमतीची एक ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. २३५/२०२६ अन्वये कलम ३०३(२) BNS सह कलम ७ व ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा वॉच

दुधना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी बोरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, नदीपात्रातील रेती चोरीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, तसेच पोलीस अंमलदार राजेश जठाळ, प्रताप साळवणे आणि संघसेन कांबळे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *