मोहाडी पोलिसांची धडक कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

मोहाडी पोलिसांची धडक कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

…पण मोहाडी तहसीलदारांना हा गैरप्रकार का दिसत नाही? वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?

 

मोहाडी:

मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत बेकायदेशीररीत्या रेतीची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ६,०६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईमुळे मोहाडी महसूल विभाग आणि तहसीलदारांच्या संशयास्पद भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पोलिसांची गुप्त माहितीवरून ‘रेड’

 

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मोहाडी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मौजा रोहणा ते दहेगाव डांबरी रोडवर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी चालक-मालक हौसीलाल बाबुराव दमाहे (वय ४१, रा. चोरखमारी, ता. मोहाडी) हा आपल्या ताब्यातील निळ्या रंगाच्या ‘सोनालिका टायगर डीआय ४२’ ट्रॅक्टर (क्र. MH 36 L 7030) आणि विना नंबरच्या ट्रॉलीमधून अवैध रेतीची चोरी व वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला. या अवैध व्यवसायामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचे दिसून आले.

६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त,

सोनालिका ट्रॅक्टर: किंमत ५,००,०००/- रुपये

विना नंबर ट्रॉली: किंमत १,००,०००/- रुपये

एक ब्रास रेती: किंमत ६,०००/- रुपये

लोखंडी फावडे व घमीला: किंमत १००/- रुपये

एकूण : ६,०६,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात अप क्र. ३४८/२०२६ अन्वये, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(ई), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

सर्वात मोठा प्रश्न: मोहाडी तहसीलदारांना हा गैरप्रकार का दिसत नाही?

 

पोलिसांना जी माहिती मिळते आणि जी कारवाई पोलीस करतात, ती मोहाडी तहसील कार्यालयाला का समजत नाही? मोहाडी तहसीलच्या हद्दीत राजरोसपणे रेतीची चोरी सुरू असताना तहसीलदार याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

महसूल विभागाचे अपयश की साटंलोटं? रेती चोरी रोखण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची (तहसीलदार) असते. परंतु, तहसीलदार कार्यालयाची सुस्ती आणि अकार्यक्षमतेमुळेच रेती माफियांचे धाडस वाढले आहे.

 

वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज: मोहाडी हद्दीतील या गंभीर गैरप्रकाराची दखल घेऊन जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. महसूल विभागाच्या या थंड कारभाराची चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *