बोरीच्या जैन वाचनालयाने ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवलीआदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरण

बोरीच्या जैन वाचनालयाने ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवलीआदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सोहळ्यात दिपालीताई चौधरी यांचे प्रतिपादन.

 

बोरी/प्रतिनिधी-मनोज टाक

 

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे

महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ प्राप्त बोरीच्या जैन वाचनालयाने ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपली आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ दिपालीताई अजय चौधरी यांनी केले.

5 सप्टेंबर 2026 शिक्षक दिनानिमित्त वाचनालयाच्या वतीने आयोजित आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मिना जैन या होत्या तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती प्रवीण रांजवण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके, भाजपा नेते तथा तिरुपती बँकेचे अध्यक्ष सतीश राव चौधरी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, माजी केंद्रप्रमुख मोहम्मद शफी, दीपक कनकुटे, ग्रामपंचायत सदस्या अश्विनीताई चौधरी, मुख्याध्यापक गोरे सर, रामा राठोड , दीपक राजुरकर,आदींची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशाला बोरीच्या आरसीन पठाण व प्रांजल सुगावकर यांनी स्वागत गीत गायले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी प्रास्ताविकातून वाचनालयाची भूमिका विशद केली.

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्रवीण रांजवण यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेट देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी मार्गदर्शन करताना दिपाली चौधरी म्हणाल्या की,

शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. एका पिढीला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम बनवण्याचे मोठे काम शिक्षक करत असतात. आज अशाच एका कर्तृत्ववान शिल्पकाराचा, जिल्हा परिषद प्रशाला, बोरीचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण सरांचा ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन गौरव केला जात आहे, ही त्यांच्या कामाची पावती आहे असे मी समजते.

चांगल्या कामाची कुठेतरी नोंद होतच असते, जैन वाचनालयाने रांजवण सरांची या पुरस्कारासाठी निवड केली असे सांगून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत आडके यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ज्या शाळेच्या वर्गात बसून मी शिक्षण घेतले ,त्याच शाळेच्या व्यासपीठावर आज शिक्षकांबद्दल बोलण्याची संधी मिळत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मत तिरुपती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते सतीश चौधरी यांनी स्पष्ट करून सत्कारमूर्ती रांजवण सरांना शुभेच्छा दिल्या तर जैन वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

बोरीच्या जैन वाचनालयाचे ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. केवळ पुस्तकांची देवाण-घेवाण न करता विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून हे वाचनालय बोरीचे एक सांस्कृतिक केंद्र बनवले आहे, असे प्रतिपादन संतोष तायडे यांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना आदर्श मुख्याध्यापक प्रवीण रांजवण म्हणाले की, शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त बोरीच्या जैन वाचनालयाने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी माझी निवड केली, निश्चितच या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. शाळेच्या विकासासाठी ज्यांना ज्यांना मदत मागितली त्या सर्वांनी मदत केली त्यामुळेच मी शाळेसाठी विविध उपक्रम राबवू शकलो. माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मला मोलाची साथ मिळाली त्यामुळे मी या शाळेसाठी काहीतरी करू शकलो.

अध्यक्षीय समारोप वाचनालयाच्या अध्यक्षा सौ.मीना जैन यांनी केला. रांजवण सरांचे कार्य पाहूनच आम्ही त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष बोरोले सरांनी यांनी केले तर वाचनालयाचे उपाध्यक्ष पवन ओझा यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *