गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक पवित्र; नियमांचे पालन करण्याच्या सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक पवित्र; नियमांचे पालन करण्याच्या सूचना

 

*गोंदिया* दि. १४ सप्टेंबर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा,

गोंदिया जिल्हा पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील प्रेरणा हॉल येथे जिल्ह्यातील डीजे चालक-मालकांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील डीजे चालक-मालक उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर डीजेचा वापर केला जात असल्याने होणारे ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन डीजे चालक-मालकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिसांकडून देण्यात आले.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी डीजेच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. सार्वजनिक शांतता आणि नागरिकांच्या जीवनमानाला बाधा पोहोचेल अशा पद्धतीने डीजेचा आवाज वाढवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. नियमबाह्य आवाज आढळून आल्यास संबंधित गणेश मंडळ तसेच डीजे चालक-मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

गोरेगांव तालूका प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *