भंडारा पोलिसांची लाखांदूरमध्ये वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या; कोटींचा मुद्देमाल जप्त, तहसील प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
लाखांदूर -:
लाखांदूर तालुक्यातील अवैध वाळू उपशाविरोधात भंडारा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ४९ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चुलबंद नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सुरू असणाऱ्या या मोठ्या काळ्या बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. मात्र, या धडक कारवाईमुळे लाखांदूर तहसीलदाराच्या (महसूल विभाग) भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असताना स्थानिक महसूल प्रशासन झोपले होते का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मध्यरात्रीची धडक कारवाई आणि मुद्देमाल जप्त
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भंडारा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चिचोली रोड, आतली घाट येथील चुलबंद नदीपात्रात सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळावरून:
२ ट्रक टिप्पर (किंमत ८० लाख रु.)
२ जेसीबी मशीन (किंमत ७० लाख रु.)
२ ट्रॅक्टर लोडर (किंमत ३० लाख रु.)
२१ ट्रॅक्टर (किंमत १ कोटी ६८ लाख रु.)
२३ ब्रास वाळू (किंमत १ लाख ३८ हजार रु.)
असा एकूण ३,४९,३८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून, काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्यावर लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसील कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टर, जेसीबी आणि टिप्परच्या साहाय्याने दररोज लाखो रुपयांची वाळू चोरली जात होती. वाळू माफियांचे हे नेटवर्क एवढे मोठे होते की तिथे उघडपणे ३ कोटींपेक्षा जास्त किमतीची यंत्रसामग्री कार्यरत होती. नियमानुसार, अशा अवैध गौण खनिज उत्खननावर देखरेख ठेवणे आणि कारवाई करणे ही प्राथमिक जबाबदारी स्थानिक लाखांदूर तहसीलदार आणि त्यांच्या भरारी पथकाची असते.
परंतु, एवढा मोठा अवैध कारभार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसा सुटला? पोलीस जिल्हास्तरावरून येऊन एवढी मोठी कारवाई करू शकतात, तर स्थानिक तहसील प्रशासनाला याची कुणकुणही कशी लागली नाही? यामुळे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी ‘अर्थपूर्ण संबंध’ आहेत का, असा संशय आता बळावला आहे.
लाखांदूर तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी केवळ नामधारी ठरत असून, वाळू चोरी रोखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या कारवाईने सिद्ध केले आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे जनतेतून कौतुक होत असले, तरी लाखांदूर तहसील प्रशासनाच्या या ढिसाळ आणि संशयास्पद कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार का? आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार? याकडे आता भंडारा जिल्हाचे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
