दुचाकी चोरीचा गुन्हा उघड, पारशिवनी पोलिसांनी आरोपीला अटक करून दुचाकी केली जप्त
नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि रामटेक उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन पारशिवनीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वात पारशिवनी पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीची दुचाकी जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या सालई मोकासा, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर येथील रहिवासी फिर्यादी आकाश सुनील गजभिये, वय ३१ वर्षे यांनी दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पारशिवनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. फिर्यादी यांची बजाज कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच ४० सी व्ही २६३३ ही घराच्या अंगणात उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने ती चोरून नेली. फिर्यादीच्या या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या न उघडकीस आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पारशिवनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी प्रवीण धनराज लांजेवार, राहणार सालई मोकासा, तालुका पारशिवनी याचा शोध लावला. पोलिसांनी आरोपीला नागपूर शहरातील नंदनवन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीकडून चोरी केलेली बजाज कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच ४० सी व्ही २६३३ असा एकूण ४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
