मोंढा (पांजरी) ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे?*  *कचरा संकलनाची गाडी पंचर; सचिव मुख्या

*मोंढा (पांजरी) ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे?*

*कचरा संकलनाची गाडी पंचर; सचिव मुख्यालयात राहतात की नागपूरवरूनच कारभार चालवतात ? कृषी वार्ता फलकही धूळखात!*

 

*हिंगणा पंचायत समितीच्या अगदी जवळ असलेल्या ग्रामपंचायतीची अवस्था पाहून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !*

 

*(जयश्री चव्हाण) हिंगणा* हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोंढा (पांजरी) ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावातील कचरा संकलनासाठी असलेली गाडी पंचर अवस्थेत दिसून आल्याने स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात स्वच्छता राखण्याची जबाबदारी असताना कचरा संकलन करणारे वाहनच बंद अवस्थेत असेल, तर गावातील कचरा व्यवस्थापन नेमके कसे चालते, असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत.

 

याहून गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सचिव देवेंद्र जुवारे यांच्याशी संवाद साधला असता, आपण नागपूरवरून ये-जा करतो, असे त्यांनी स्वतः सांगितल्याचे समजते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मुख्यालयी वास्तव्यासंबंधीच्या जबाबदारीचे पालन होते की नाही, याची प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक आहे. हिंगणा पंचायत समितीपासून अगदी जवळ असलेल्या आणि मुख्य रस्त्यावर वसलेल्या या गावातच अशी परिस्थिती असेल, तर दुर्गम गावांमधील प्रशासनाची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सध्या परिसरातील विविध गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असताना ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यालयात उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ पदावर राहून चालणार नाही, तर गावातील मूलभूत सुविधांची जबाबदारीही पार पाडावी लागेल.

 

विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लावण्यात आलेले तालुका कृषी विभागाचे कृषी वार्ता फलक अनेक दिवसांपासून कोणत्याही अद्ययावत माहिती शिवाय दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी लावलेले फलकच जर कोरे असतील, तर त्यांचा उपयोग नेमका कोणासाठी आणि कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो.

 

*मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी लक्ष घालावे !*

 

नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हिंगणा तालुक्याचा अचानक दौरा करून मोंढा (पांजरी) ग्रामपंचायतीच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करावी. सचिवांच्या मुख्यालयातील उपस्थितीची, कचरा संकलन वाहनाच्या स्थितीची, स्वच्छता व्यवस्थेची तसेच कृषी वार्ता फलकाच्या वापराची सखोल शहानिशा करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.

 

*ग्रामपंचायत ही जनतेच्या सेवेसाठी आहे की केवळ कागदोपत्री कारभारासाठी ?*

 

आता पंचायत समिती प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे मोंढा (पांजरी) ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *