नागपूर ग्रामीण पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर प्रहार, बुटीबोरीत मेफेड्रोन पावडरसह चौघांना अटक

नागपूर ग्रामीण पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर प्रहार, बुटीबोरीत मेफेड्रोन पावडरसह चौघांना अटक

 

 

४७.६२ ग्रॅम अमली पदार्थ व तीन मोबाईलसह २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

 

 

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, अमली पदार्थ विरोधी पथक आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेफेड्रोन पावडरची विक्री करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि नागपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नागपूर-बोरी मार्गावरील बोथली फाटा परिसरात सापळा रचून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या फिरोज इब्राहिम खान, वय ३५ वर्षे, राहणार वार्ड क्रमांक ९, जुनी वस्ती, लाकडी टाल जवळ, बुटीबोरी याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याच्या घेतलेल्या झडतीत ८.१७ ग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळली. चौकशीदरम्यान त्याने हा माल त्याचा साथीदार मोहसिन अब्दुल बेग, राहणार बुटीबोरी याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी साखळी पुरावे जोडून नागपूर शहरातून मोहसिन अब्दुल बेग, वय ४२ वर्षे, राहणार वार्ड क्रमांक १, बुटीबोरी याच्याकडून ४.३३ ग्रॅम, एहफज उर्फ लक्की अहमद खान, वय २६ वर्षे, राहणार शिवनकर नगर, खरबी चौक, नागपूर याच्याकडून १७.३२ ग्रॅम आणि फारुख मुल्ताज शेख, वय २५ वर्षे, राहणार रोशन नगर, नागपूर याच्याकडून १७.८० ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त करून तिघांना अटक केली.

या कारवाईत चारही आरोपींकडून २ लाख ३८ हजार १०० रुपये किमतीची एकूण ४७.६२ ग्रॅम मेफेड्रोन पावडर आणि तीन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण २ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ क, २० ब आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून साखळी पुरावे जोडून नागपूर ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *