अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; हातातोंडाशी आलेले धान पीक पाण्यात!*

*अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; हातातोंडाशी आलेले धान पीक पाण्यात!*

 

*शेतात कापून ठेवलेले धान भिजले; हार्वेस्टरने काढलेल्या पिकाचेही नुकसान, नुकसानभरपाई मिळणार तरी कधी?*

 

गोंदिया, दि. ३० ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन धान कापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतात कापून ठेवलेले धान पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले असून, हार्वेस्टरच्या साहाय्याने काढणी केलेल्या धान पिकालाही पावसाचा फटका बसला आहे.

आधीच वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी होणारा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच अवकाळी पावसाने हातात आलेले पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कर्ज काढून केलेली शेती आणि वर्षभर घेतलेली मेहनत पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

नुकसानभरपाई मिळणार तरी कधी?

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. शेतात कापून ठेवलेले धान तसेच हार्वेस्टरने काढणी केलेल्या पिकाच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ऐन कापणीच्या हंगामात पावसाची अवकृपा

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. याच काळात धानाची कापणी आणि मळणी केली जाते. मात्र, कापणीच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. पावसामुळे धान भिजल्याने त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत. शेतकऱ्यांना त्वरित मदत देऊन द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

गोरेगांव तालुका प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *