नायगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या सात मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन; हेक्टरी ५० हजार ते १ लाख मदतीची मागणी
खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे नायगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सर्व सवलती लागू कराव्यात, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
१ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान ५६१ मिलिमीटर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४१४ मिलिमीटर पाऊस झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून आगामी रब्बी हंगामावरही संकटाचे सावट असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या सात प्रमुख मागण्या
– नायगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा.
– जिरायती पिकांसाठी हेक्टरी ५० हजार, तर बागायतीसाठी १ लाख रुपये मदत द्यावी.
– शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा द्यावा व विम्यातील बंद केलेल्या जोखमी पुन्हा सुरू कराव्यात.
– चारा छावण्यांऐवजी पशुपालकांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट आर्थिक मदत द्यावी.
– शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
– बारूळ कालव्यातून नायगाव तालुक्यासाठी पाणी सोडावे.
– सरसकट पीक कर्जमाफी करून नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.
शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने जिल्हा प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवून कार्यवाही करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास नायगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी गजानन पाटील होटाळकर, रमेश कांडाळकर, शिवा वडजे गोदमगावकर,पांडुरंग चव्हाण, सुगावे पाटील ,अजिंक्य कल्याण, संतोष कदम हिप्परगेकर, पत्रकार बळवंत मोरे, पंडित सुगावे, शिवाजी शहापुरे, सुनील पवार, रामदास उमरेकर, लक्ष्मण जाधव मोकसदरा, गणेश ढगे, साहेबराव शिंदे, श्याम शिंदे गोदमगावकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सिटी इंडिया न्यूज ओमकार पोतलवाड
