खापा येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधून साजरा केला ‘राखी रक्षक’ उपक्रम!
तुमसर – : समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खापा येथील शालेय विद्यार्थ्यांनी ‘राखी रक्षक’ हा आगळावेगळा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी तुमसर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन अत्यंत उत्साहात साजरे केले. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, यामुळे पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले आहे.पोलीस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही सदैव तत्पर असता. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो,” अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा प्रेमाचा धागा पाहून पोलीस अधिकारी व कर्मचारीही भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाला प्रमुख पावणे म्हणून तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, PSI प्रविण सयाम, पोलीस शिपाई रितेश पडोळे तसेच नितीन झंझाड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवेला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी देत असलेल्या योगदानाला मनापासून सलाम केला.या भाविनक क्षणी पोलीस अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचे सुंदर नाते पाहायला मिळाले. याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाच्या नियोजनासाठी हेमा निखाडे, अश्विनी डोंगरे, दिगंबर उपरीकर, आशिष ढबाले, प्रतीक उरकुडे, अजय यादव यांनी सहकार्य लाभले.समाजात कृतज्ञतेचा संदेश समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींप्रती आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित अर्थ न ठेवता समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. राखीच्या या कोमल धाग्याने पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील विश्वास, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे नाते अधिक घट्ट केले आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
