मिलाद-उन-नबी निमित्त जिंतूरमध्ये सकल मुस्लिम समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिर
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची भेट; रक्तदात्यांना दिल्या शुभेच्छा
४०० रक्तदात्यांनी केले रक्तदान; डॉ. ओमकार भालेराव यांची माहिती
जिंतूर प्रतिनिधी : मनोज टाक जिंतूर
प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्मदिनानिमित्त मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वावर आज, दि. २८ ऑगस्ट रोजी जिंतूर येथे सकल मुस्लिम समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिंतूर येथील मदरसा दारुल उलूम महेमुदिया, जामा मस्जिद परिसरात आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. समाजातील युवकांसह विविध नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरास राज्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. सकल मुस्लिम समाजातर्फे मिलाद-उन-नबी निमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
यावर्षी मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने शहरात रॅली व डीजे न लावता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मानवतेचा, सामाजिक एकतेचा व जनसेवेचा संदेश देण्यात आला.
या शिबिरामध्ये तब्बल ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती डॉ. ओमकार भालेराव यांनी दिली. मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मुस्लिम बांधव, युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सकल मुस्लिम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
