पोहण्याचा मोह’ तरुणाच्या जीवावर बेतला

पोहण्याचा मोह’ तरुणाच्या जीवावर बेतला

 

कळमेश्वर-काटोल मार्गावरील चारगाव तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कळमेश्वर येथील एका तरुणाचा पोहण्याचा मोह जीवावर बेतला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना सोमवारी (२० जूलै) सायंकाळी घडली. मंगळवारी (२१ जूलै) दुपारी दोन वाजता शोधमोहीमे दरम्यान त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमित ज्ञानेश्वर वखारे (३०, रा. कळमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित वखारे हे सोमवार (२० जूलै) रोजी सायंकाळी काही मित्रांसोबत चारगाव तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तलावात पोहण्याचा मोह अनावर झाला. व त्यांनी तलावात प्रवेश केला. मात्र, पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच मोहपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपासून उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधार पडल्याने ती थांबविण्यात आली.

मंगळवारी (२१ जूलै) सकाळी पुन्हा नावाडी व तैराकांना पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास अमित वखारे यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

मोहपा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती मोहपा पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते यांनी दिली. पुढील तपास मोहपा पोलीस करीत आहेत.

◼पावसाळ्यात जलाशयांपासून सावध राहण्याचे आवाहन…

पावसाळ्यात तलाव, नदी व धरणांमधील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी पोहणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः युवकांनी, जलाशयांमध्ये पोहणे टाळावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरिक्षक ईश्वर हनवते यांनी केले.

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *