उमरखेड पोलिसांची धडक कारवाई : धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या इसमाला अटक; तलवार जप्त

उमरखेड पोलिसांची धडक कारवाई : धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या इसमाला अटक; तलवार जप्त

 

 

 

उमरखेड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात धडक कारवाई करत धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे २८ इंच लांबीची व १.५ इंच रुंदीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जुलै २०२६ रोजी रात्री उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकातील कर्मचारी राजाराम पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उमरखेड–ढाणकी रोडवरील ढाणकी पुलाजवळ सापळा रचण्यात आला.

या कारवाईदरम्यान शेख जिब्राल शेख रहीम (वय २४ वर्षे, रा. अय्याबाबा कॉलनी, उमरखेड) याच्याकडे विनापरवाना धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पंचनामा करून सुमारे ₹५०० किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

उमरखेड परिसरात कोणीही अवैध शस्त्रे, अग्निशस्त्रे किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास ती तात्काळ उमरखेड पोलीस ठाण्यास कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

✍️ तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख

📞 भ्रमणध्वनी : +91 90679 34036

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *