देवलापार पोलिसांची धडाकेबाज कारवाई: १०.२८ लाखांच्या मुद्देमालासह विदेशी दारू जप्त, खाकीची मान उंचावणारी कामगिरी!
देवलापार:कर्तव्यदक्षता आणि गोपनीय माहितीचे अचूक विश्लेषण करत देवलापार पोलिसांनी अवैध दारू तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. जुन्या देवलापार पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी करून पोलिसांनी १० लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
१ जुलै २०२६ रोजी देवलापार पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, एका कारमधून अवैध विदेशी दारूची तस्करी केली जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्या आणि जुन्या पोलीस स्टेशनसमोर सापळा रचला. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणाऱ्या स्विफ्ट कार (क्र. MH-32/AX 5997) ला थांबवण्यात आले.मोठा साठा जप्त:वाहनाची कसून झडती घेतली असता, पोलिसांना कारमध्ये खाकी रंगाच्या खोक्यांत दडवून ठेवलेला ‘ऑफिसर्स चॉईस’ या विदेशी दारूचा मोठा साठा आढळला. यामध्ये:विदेशी दारू: ३,२८,३२० रुपये किमतीच्या एकूण १९२० निपा.वाहन: ७,००,००० रुपये किमतीची स्विफ्ट कार.एकूण जप्त मुद्देमाल: १०,२८,३२० रुपये.आरोपी पोलिसांच्या जाळ्यात:या कारवाईत तुषार प्रभाकर बदलमवार (वय ३०, रा. वर्धा) आणि रूपेश शिवदास कांबळे (वय २५, रा. वर्धा) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक:तस्करांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी जंगजंग पछाडले, मात्र देवलापार पोलिसांच्या सतर्कतेपुढे त्यांचे काहीच चालले नाही. अत्यंत कौशल्याने आणि वेगाने केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून सर्व स्तरांतून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.”गुन्हेगारांना जरब आणि जनतेला सुरक्षा” हे ब्रीद सार्थ ठरवत देवलापार पोलिसांनी तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेला हा एल्गार कौतुकास्पद आहे!
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
