सगरोळीच्या शिवाजी हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’; विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर जनजागृती कार्यक्रम
सगरोळी, दि. ३० (ॲड.डाॅ.प्रकाश जोशी)
विद्यार्थ्यांचे बालपण सुरक्षित राहावे, त्यांना बालकांचे हक्क, संरक्षणविषयक कायदे आणि कायदेशीर अधिकारांची माहिती व्हावी, या उद्देशाने सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, तालुका विधी सेवा समिती, बिलोली, अभियोक्ता संघ बिलोली व पंचायत समिती बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. राजेंद्र हुदार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनील देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. श्री. बालाजी पाटील,अधिवक्ता संघाचे अध्यक्ष एस.एन.पाटील,विधीज्ञ आय.सी.तळणीकर ,महेश कुलकर्णी,पी.डी गुजरवाड,प्रकाश जोशी,आकाश सोनकांबळे,जी.के.मदनूरे उपस्थित होते.शाळेच्यवतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, बालकांचे संरक्षण, बालकांशी संबंधित कायदे, बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध, तसेच अन्याय किंवा शोषण झाल्यास उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण याविषयी विधीज्ञ आय.सी.तळणीकर ,अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. एस.एन.पाटील, सुनील देशमुख यांनी मार्गदर्शन केले .. कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश राजेंद्र हुदार म्हणाले की, विद्यार्थी व शिक्षक यांचं नातं कुटुंबासारखा असावे. शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घ्यावा. मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले की अभ्यासात उन्नती होते. दिव्यांग विद्यार्थ्यांची हवेलना करू नये असे त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना आवाहन केले. एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला शाळा प्रमुख व संस्था प्रमुख यांना कळवावे.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित आणि भयमुक्त बालपणाचे महत्त्व पटवून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे, असा संदेश देण्यात आला.संस्था एवढ्या ग्रामीण भागात चांगले दर्जेदार शिक्षण देते याचे कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कायदेविषयक जनजागृतीला चालना मिळणार असून बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्यवेक्षक आकाश शिंदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक संभाजी विभूते, पर्यवेक्षक प्रल्हाद नरडेवाड,बिलोली न्यायालयीन कर्मचारी जेष्ठ लिपीक संजय शेवाळे यांनी विशेष परीश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
