शेंदुर्णी येथे शेतकऱ्याची विषारी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर मृत्यूशी झुंज अपयशी!
नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबाच्या भविष्याच्या चिंतेतून टोकाचे पाऊल; शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत करावी, ग्रामस्थांची मागणी
शेंदुर्णी (ता. जामनेर) : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी रमेश समाधान कोळी (वय ४८) यांनी दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नापिकी, आर्थिक अडचणी, लोकांची देणी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता अशा अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागत होता. मुलांचे भविष्य काय असेल, मुला-मुलींची लग्ने कशी करावीत, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ कसा करावा, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर मात कशी करावी, अशा अनेक प्रश्नांनी ते चिंताग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.
रमेश कोळी यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई-वडील, दोन मुले, एक मुलगी, जावई, नात आणि नातू असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शासनाने या कुटुंबाकडे संवेदनशीलतेने लक्ष द्यावे!
शेतकरी कुटुंबावर आलेले हे संकट लक्षात घेता शासनाने संबंधित घटनेची योग्य चौकशी करून पात्रतेनुसार शासकीय मदत, आर्थिक नुकसानभरपाई आणि इतर आवश्यक योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांवर मोठे संकट ओढवत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. एका कुटुंबाचा आधार हरपला असून आता शासनाने या निराधार कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.सिटी इंडिया न्यूज
जामनेर तालुका प्रतिनिधी : राहुल चौधरी
